अकोला : लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहा. कारण लग्न न होणाऱ्या मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
राज्यात लग्न लावून त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकरणारी टोळी सक्रिय झाल्या आहेत. नुकताच असा एक प्रकार जालना येथे घडला होता. त्याचीच पुनरावृत्ती अकोक्यात झाली आहे. नंदुरबार येथील राहूल विजय पाटील हा गेल्या तीन ते चार वर्षापासून लग्नाकरीता मुली बघत होता. लग्नाकरीता योग्य मुलगी न मिळाल्याने आरोपी तूळशिराम करवते उर्फ योगेश यांच्याशी तोंड ओळखीने संपर्कात आला. आरोपींनी अकोल्यातील काही मुलींचे फोटो पाठवून मुली पसंद असल्याने भेटण्यास राहुला बोलावले आणि मुली पाहण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला.
यादरम्यान आरोपीने मुलीच्या आईवडिलांना देण्यासाठी म्हणून 1 लाख 60 हजार रुपये सोबत घेवून सहपरीवारसह पातूर येथील बसस्टँन्ड वर येण्यास सांगीतले. यावेळी आरोपीने अकोल्यातील काही मुली लग्नाकरिता दाखविल्या. त्यानंतर एका मुलीसोबत पातूर रोडवरील महालक्ष्मी माता मंदीर येथे लग्न लावून देण्यात आलं आणि एक लाख तीस हजार रोख सुद्धा राहुलने आरोपींना दिली.
मुलगी मनिषा पाटील व राहुलचे कुटुंब लग्न लाऊन परत जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले आणि गाडीला कट का मारला म्हणून वाद घातला. यावेळी मुलगी मनिषा पाटील ( नवरी ) गाडीच्या खाली उतरुन मागुन येणाऱ्या दोन मोटारसायकलवर आलेल्या दुचाकीवर बसून पसार झाली. यावेळी सुदाम करवते उर्फ योगेश याचा फोन लावला असता तो बंद होता. या नंतर आपली फसवणूक झाल्याचे राहुल आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
अकोला पोलिसांनी आरोपी सुदाम तुळशीराम करवते, मनिषा पाटील आणि इतर सहा 6 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसात पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. आता पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. याआधी त्यांनी आणखी किती लोकांची अशी फसवणूक केली आहे याबाबत पोलीस तपासाच पुढे येईलच. पण अशा लोकांपासून इतरांनी सावध राहण्याची गरज आहे.