प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : (Bhandara News) भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्याच्या चिखला गावातून 1 जानेवारी रोजी सायंकाळी नील चौधरी हा चार वर्षीय चिमुकला बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिमुकल्याचे अपहरण किंवा हिंस्र प्राण्याने शिकार तर केली नसावी, या शक्यतेतून वनविभाग आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू असुन देखील तीन दिवस लोटून सुद्धा पत्ता लागला नाही. नीलचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. तरीही चिमुकल्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
तुमसर तालुक्यातील चिखला गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या 52 कॉलनी येथे नील हा घराच्या अंगणात खेळत होता. मात्र, अंधार पडूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने गावातील वस्तीत शोध घेतला. मात्र, तरीही तो सापडला नाही. त्यामुळे शेवटी हताश झालेल्या कुटुंबीयांनी गोबरवाही पोलीस स्टेशन गाठून नील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनीही तातडीने त्याचा शोध घेतला पण, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळच जंगल लागून असल्याने वन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. तीन दिवसापासून पोलीस, वनविभागाच्या टीमने जंगल पिंजून काढलं, ड्रोन, डॉग स्क्वाड यांच्या साहाय्यानेदेखील शोध घेण्यात आला. पण अजुनही नील चौधरीचा पत्ताच लागला नाही. ज्यामुळे आता निलच्या आईचे डोळे जंगलाच्या दिशेने लागले आहेत.
चिखला गावात अनेकदा जंगली प्राणी येतात त्यांनीच मुलाला नेलं असं गावकऱ्यांचा म्हणणं आहे. पण, पोलीस वन विभाग पाहिजे त्या प्रमाणे शोध मोहीम करत नाही उलट प्रकरण एक दुसऱ्यावर टाकत असल्याचं निदर्शनास येत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होउन आज जर मुलाचा शोध लागला नाही तर उद्या पोलीस स्टेशन वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे.