अमरावती : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, भाजपने शिवसेनेचे मन वळवत युतीसाठी राजी केले. युती झाली तरी काही ठिकाणी नाराजी होती, त्यामुळे शिवसेनेतून बंडाचा झेंडा फडकविण्यात आला. परंतु शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठांकडून नाराज नेत्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले. मात्र, अमरावतीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अमरावतीत शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सेनेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याने आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याचा आरोप कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी रिपाईं आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा तब्बल ३६ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह शहरातील काही नगरसेवक व काही नेत्यांनी काम केले नसल्याने खासदार आनंदराव अडसूळ यांना २७ हजार मतांचा अमरावती शहरात फटका बसला. यामुळे पराभव झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केला आहे.
या आरोपामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना अमरावती शहरात पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे मात्र नवनीत कौर - राणा अमरावतीच्या खासदार आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडणून आल्या आहेत. त्यांना काँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला होता. आता त्यांची पुढील भूमिका काय असणार याचीही उत्सुकता अमरावतीकरांना लागून राहिली आहे.