मुंबई : दिल्ली विधानसभा 2020 च्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) ७० जागांकरता (70 Seats) झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंतच्या निकालात आपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. काँग्रेसला अद्याप खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नक्की कुणाला असणार आहे? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंतिम निकालापर्यंत भाजप पुढे जाईल असा विश्वास आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे.
दिल्ली निवडणुकीचा निकाल हा अटीतटीचा असून आता चित्र जरी वेगळं असेल तरी अंतिम निकालात चित्र बदलू शकेल असं मत राम कदम यांनी व्यक्त केलं. गेल्या वेळेपेक्षा यावेळी जास्त जागा मिळत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केलीय...भाजपचा अहंकार जनतेने नाकारत विकास आणि विश्वासाला मत देत आप पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचं मत नवाब मलिकांनी व्यक्त केलंय.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. यावर्षी मोदींच्या मार्फत भाजप सत्तारूढ होणार का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.