'ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल', नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया

'मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, जनतेला कुठेही त्रास नको म्हणून स्वत: शरण आलो'

Updated: Feb 10, 2022, 03:57 PM IST
'ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल', नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया title=

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर आज पहिल्यांदा भाजप आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीलाच नितेश राणे यांनी न्यायालय आणि न्यायव्यवस्थेचे आभार मानले. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचमुळे आजचा दिवस आम्हाला अनुभवायला मिळतोय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

राजकारणाचा स्तर किती खाली गेलाय हा विचार करण्याची वेळ आली आहे. आता विषय न्यायप्रविष्ठ आहे, म्हणून या विषयावर बोलणार नाही,  पण ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपीचा त्रास निश्चित पद्धतीने सुरु होईल असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

काय म्हणाले नितेश राणे? 
ज्या दिवशी म्हणजे १८ डिसेंबरला जेव्हा ही घटना घडली, तेव्हापासून पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना जी जी माहिती हवी होती, सर्व तपास कार्यात मी मदत करत होतो, तशीच यापुढेही तपास कार्यात माझी मदत लागेल. मला न्यायालयाने ज्या अटी शर्थी लावून दिलेल्या आहेत, त्या सर्व अटी-शर्थीचं पालन करुन जेव्हा जेव्हा मला बोलवतील तेव्हा तेव्हा मी तपासकार्यात मदत करणार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मी कोणत्याही तपासकार्यातून लांब गेलो नव्हतो. कुठल्याही तपासकार्यात मी अडथळा आणला नाही, माहिती लपवली नाही. मला जे प्रश्न विचारेल त्या सर्वांची माहिती मी दिली.

मी  विधीमंडळाचा सदस्य आहे, एक लोकप्रतिनिधी आहे, जबाबदारीने वागणे, हे माझ्याकडून अपेक्षित असतं, म्हणून त्यानुसार मला जेव्हा जेव्हा मला कोणीही सहकार्य मागितलं तेव्हा एक जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहाकार्य करत होतो, पळण्याचा कोणताही प्रश्न आला नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

पोलिसांनी अटक करण्याची पण गरज भासली नाही, ज्या दिवशी मी सरेंडर झालो, त्यानंतरही मला चार दिवस सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण होतं, पण तरीही एक दिवस अगोदर जे काही कोर्टाबाहेर घडलं, ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना, सहकार्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरु झाला, आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला, की सिंधुदुर्गच्या जनतेला माझ्यामुळे कुठलाही त्रास नको, म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली, वकिलांशी चर्चा करुन मी सरेंडर झालो, मला अटक करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सरकार मला अजूनपर्यंत अटक करु शकलेले नाहीत. माझ्या तब्येतीबद्दल जे काही विषय सुरु होते, मला आश्चर्य वाटतं मला जो आजही त्रास होतोय, मी कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी दोन दिवस अॅडमीट होणार आहे. त्यानंतर मुंबईला जाणार आहे. 

मला ब्लडप्रेशरचा त्रास होत आहे, शुगर लो  होत आहे. पण जे माझ्यावर आरोप होत होते, की राजकीय आजार आहे, खोटं बोलतोय, असा आरोप करण्यात आला.  माझे रिपोर्ट काढण्यात आले ते ही खोटं होतं का, कोणाच्या आजारावर असं प्रश्न उपस्थित करणं हे कोणत्या नितिमत्तेत बसतं? आम्हीही प्रश्न उपस्थित करु शकतो असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेशा आहे का हा विचार करायला हवा, आम्ही विचारलं तर चालेल का की जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया सुरु होता, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात. आम्ही विचारल तर चालेल का. लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बेल्ट नाही काही नाही आणि मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात, असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. 

महाविकास आघाडीचे जे नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाया सुरु होतात, तेव्हाच त्यांना चौदा दिवस कोरोना कसा होतो, हे प्रश्न आम्ही विचारलं चालेला का, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.