'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.  

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2024, 08:14 PM IST
'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात title=

विविध बहाणे करुन, भूलथापा देऊन लोकांना गंडवलं जातं... अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. व्यक्तीगत रुपातही फसवणूक केली जाते. अशाही घटना काही नवीन नाहीत. मात्र पद्धतशीरपणे आखणी करुन, कारस्थान रचून, एक दोघांना नाही तर अनेकांना एकाचवेळी लुबाडण्याचा कट आखला गेला आणि तो अंमलातही आणला गेला. यातून उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहणा-या तरूणांना धोका दिला गेला. सोबतच पोलिसांनाही थेट आव्हान दिलं गेलं. काय आहे हे नेमकं प्रकरण, यासाठी पाहुयात आमचा हा विशेष वृत्तांत.

संभाजीनगरमध्ये बोगस कमांडो भरती

पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर भरतीचा देखावा

सतर्क तरुणांमुळं बोगस भरतीचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुरु असलेली ही कमांडो भरती पाहा. लष्करी वेशात असलेले तिघे अधिकारी भरती प्रक्रिया राबवत होते. सगळं काही अस्सल भरतीप्रमाणं वाटत होतं. पण ही सगळी भरती प्रक्रिया बोगस होती, ते अधिकारीही तोतया होते. हे सगळं संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर सुरु होतं आणि पोलिसांना याचा पत्ताही नव्हता. महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.

कंत्राटी तर कंत्राटी पण अंगावर खाकी चढणार या आशेनं  शंभरावर तरुण या मैदानावर आले. यातल्या 93 जणांना त्यांची निवड झाल्याचं सांगण्यात आलं. 25 डिसेंबरला त्यांना ट्रेनिंगला पाठवायचं आहे असं सांगून त्यांना पुन्हा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बोलावण्यात आलं. त्यांच्याकडून नियुक्ती आणि गणवेशशुल्कापोटी प्रत्येकी सहा हजार रुपये मागण्यात आले.

भरतीप्रक्रियेत पैशांची मागणी झाल्यावर तरुणांना संशय आला. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी मूळ पंढरपूरच्या विशाल देवळी,विलास माने आणि सनी बागव या तिघांना अटक केली.

संभाजीनगर पोलिसांच्या नाकाखाली बोगस भरती प्रक्रीया राबवली जात होती. एवढं सगळं होत असताना पोलीस यंत्रणेला त्याची साधी माहितीही नव्हती...या प्रकरणाच्या निमित्तानं पोलिसांना शहरात काय चाललंय याची माहितीही नव्हती का असा सवाल विचारला जाऊ लागलाय.