नाशिक : Bullock cart race : बंदी उठवल्यानंतर नाशिकच्या ओझरमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, शर्यतीत बैलगाडी अनियंत्रित झाल्याने गोंधळ उडाला. यावेळी कोविड नियम पायदळी तुडविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचा उत्साह दिसून आला.
गेल्या सात-आठ वर्षांपासून बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने बैलांना सध्या शर्यतीची सवय नव्हती, असे चित्र दिसून आले. दरम्यान, सदस्यता नोंदणी करून शर्यत सुरू होण्याच्या ठिकाणी जाताना एक बैलगाडी अनियंत्रित झाली आणि मोठा गोंधळ उडाला.
शर्यतीचे ठिकाण सोडून बैलगाडी थेट पार्किंग परिसरात गेल्याने थोडक्यात अपघात टळला. यावेळी एक बैल पूर्णपणे घसरत गेल्याने त्याला दुखापत झाली. बैलगाडी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी अनेक लोकांनी मास्क परिधान केलेले नव्हते. सध्या राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढत आहे. असे असताना कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाचा धोका वाढल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.