R Ashwin : भारताचा माजी दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. शनिवार 2 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यात आर अश्विनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी 37 वर्षीय आर अश्विनला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्याच आयुष्य कसं सुरु आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अश्विनने जे उत्तर दिले ते ऐकून सर्वांनाच हसू आले.
मुंबईत शनिवारी बीसीसीआय नमन अवॉर्ड्स 2025 पार पडला. यात महिला आणि पुरुष क्रिकेटचे अनेक युवा आणि दिग्गज खेळाडू उपस्थित होते. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये आर अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. अश्विन ऑस्ट्रेलियावरून घरी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याचे जल्लोषात स्वागत केले. मात्र अश्विनला पुरस्कार सोहळ्यादरम्यान निवृत्तीनंतर पूर्णवेळ कुटुंबासोबत राहण्याचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अश्विन म्हणाला, "त्यांनी मला बाहेर काढले, ते मला खूप कंटाळले आहेत. मी यापूर्वी इतके दिवस कधीच घरी राहिलो नाही. मी आधी सुद्धा मुलांना सोडलं आहे, परंतु त्यांना सोडणं आणि परत आणण आणि आता त्यांच्या दिनचर्येचा भाग बनणं असं आहे की ज्याच्याशी मी सहमती दिली नव्हती. परंतु मी मानतो की मी याचा भरपूर आनंद घेत आहे".
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती, रणजी सामना खेळून 28 वर्षांचं करिअर संपवलं
बीसीसीआयचा विशेष पुरस्कार प्राप्त झाल्यावर आर अश्विनने म्हंटले की, "मी जेव्हा आयपीएलच्या ट्रेनिंगसाठी मैदानात उतरलो तेव्हा मला समजले की माझी बोटं आजही गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहेत. संपूर्ण कारकीर्द माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि सचिन तेंडुलकरबरोबर मंच शेअर करणं माझं भाग्य आहे. चेन्नईमध्ये गल्ली क्रिकेट खेळणार्या माझ्या सारख्या मुलाचे हे एक स्वप्न होते".
आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत.