Sonam Kapoor Cried On Ramp: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूरने बरेच चित्रपट दिले आहेत. अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने 18 वर्षांपूर्वी संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करुन लग्नानंतर मात्र चित्रपटाच्या मोठ्या पडद्यापासून ती दूर राहिली. सोनम कपूर आज जरी चित्रपटातून झळकत नसली तरीसुद्धा वेगवेगळ्या इंवेट्समधील तिच्या अनोख्या फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत राहत असते. वेगवेगळ्या फॅशन इंवेंट्स मधून ती चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतंच, सब्यासाचीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या इवेंटमध्ये ती सहभागी झाली होती. या इवेंटमधला तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओ मध्ये सोनम कपूर रँप वॉक करताना दिसत आहे. मात्र, रँप वॉक करताना ती अचानक भावूक होऊन तिला रडू कोसळतं. अचानक भावूक झाल्यामुळे रँप वॉक करताना ती हात जोडते आणि तिथून निघून जाते. सोनम कपूरच्या या व्हिडीओवरुन लोकांच्या वेगवेगळे प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आपल्या अनोख्या फॅशन सेन्स मुळे ओळखली जाणारी सोनम कपूर आदल्या रात्री गुरुग्राममध्ये स्वर्गीय डिझायनर रोहित बल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फॅशन इवेंटमध्ये रॅम्प वॉक करण्यासाठी सहभागी झाली होती. त्यावेळी रँप वॉक करताना रोहित बल यांच्या आठवणीत ती खूप भावुक झाली आणि यामुळेच रडतच ती रँपवरुन खाली आली.
रोहित बल यांच्या आठवणीमुळे सोनम कपूरला रँपवर हुंदका आवरु शकली नाही. रोहित बल यांचे निधन मागील वर्षीच म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 रोजी झाले. 63 वर्षाच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. रँप वॉक करताना सोनमला त्यांची आठवण आली आणि ती अचानक रडू लागली. व्हिडीओ मध्ये सोनम कपूर ही रोहित बल यांनी डिझाइन केलेला पोशाख परिधान करुन रँप वॉक करताना दिसत आहे. रँप वॉक करताना सोनम कपूरने पांढऱ्या रंगाचा फ्लोर-लेंथ ड्रेस परिधान केला होता. यावर तिने फूल स्लीव्जचे जॅकेट घातले होते. तसेच, केसांचा मागील बाजूस जुडा घातला होता आणि त्यात गुलाबाची फुले लावून एक आकर्षक हेअरस्टाइल केली होती.
सोनम कपूरच्या रँप वॉक करतानाच्या व्हिडीओवरुन बहुतांश नेटकरी तिला ट्रोल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिले, "जर तुम्ही खरंच रडला असता, तर ते रडू खरं वाटलं असतं." तसेच, "ओव्हर अॅक्टिंगचे 10 रुपये कापा", असे दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले. "जर चित्रपटात असं काम केलं असतं तर ते अधिक प्रभावी वाटलं असतं", असं म्हणत एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं. अशा नेटकऱ्यांच्या बऱ्याचशा कमेंट्स सोनमच्या रँप वॉकच्या व्हिडीओला घेऊन पाहायला मिळाल्या.