प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपण किती उजवे आहोत, आपल्यालाच का मतदान का करावं हे सांगण्यासाठी रॅली, प्रचारसभा घेत आहेत. राजकीय पक्षांकडून लाखो रुपये खर्च करत जाहीराती, कॅम्पेनिंग केलं जातंय. मतदारांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या राजकीय पक्ष लढवत आहे. या सर्वात मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाहीचा गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणारेही हात समाजात पुढे येत आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या जोडीला अनेक सेवाभावी संस्था, दुकानदार, व्यावसायिक प्रयत्न करत असतात. परळच्या ओमकार भोवर या तरुण उद्योजकानेही मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी आवाहन केले आहे. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकाला त्याच्या 'बुलेट वर्ल्ड' मध्ये बुलेटची एक सर्व्हीस मोफत मिळणार आहे.
परळच्या केईएम रुग्णालयाजवळ ओमकारचे 'बुलेट वर्ल्ड' नावाचे गॅरेज आहे. या ठिकाणी बुलेट सर्व्हीसिंगचे काम होत असते. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ओमकारने केलाय. सध्या बुलेट चालवणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या बुलेट करांना जागृत मतदार करण्यासाठी ओमकार प्रयत्न करतोय. स्वत:कडे बुलेट असणे हे जसे आपण अभिमानाने सांगतो त्याप्रमाणे मतदान केलंय हे देखील तितक्याच गर्वाने तरुणांनी सांगावे असे ओमकारला वाटते. तुम्ही जर बुलेट सर्व्हिसिंगला कोणत्याही गॅरेज, किंवा बुलेट सेंटरमध्ये गेलात तर साधारण 1800 ते 2000 रुपयांपर्यंतचा खर्च तुम्हाला येतो. पण जर तुम्ही मतदान करुन त्याचा पुरावा 'बुलेट वर्ल्ड' ला दिलात तर तुमचा हा बुलेट सर्व्हिसिंगचा खर्च वाचणार आहे.
मतदान केल्यानंतर मोफत सर्व्हीसिंग मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा एक सेल्फीhttps://form.jotform.me/91122283590453 या लिंकवर पाठवावा लागणार आहे.
बसं..एवढं करुन तुम्हाला तुमच्या बुलेटसाठी फ्री सर्व्हीसिंग मिळू शकणार आहे. 29 एप्रिल सकाळी 6 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रात्री 11.59 वाजेपर्यंत हे सेल्फी स्वीकारले जाणार आहेत.
मुंबई आणि ठाण्यातील मतदारांसाठी ही संधी असणार आहे.
'प्रत्येक मत हे लोकशाही मजबूत करत आपल्या जबाबदारीची जाणिव करुन देत असतं म्हणून तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडायला हवे', यासाठी हा उपक्रम असल्याचे असे ओमकार भोवर 24taas.com ला सांगितले.