Canada Telsa Blast : टेस्ला कारने कमी वेळात जगभरात आपली ओळख बनवली आहे. ही कार भारतात आली नसली तरी देशात या कारबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. दरम्यान या कारच्या दुर्घटना झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना कॅनडाच्या टोरॅन्टो शहरामध्ये घडली आहे. ज्यामध्ये भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये भारतीय तरुणाचा समावेश आहे. आगीत चौघा युवकांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिकच्या इंदिरानगरमधील दिग्विजय राजेंद्र औसरकर असे या तरुणाचे नाव असून तो 30 वर्षांचा होता. दिग्विजय हा नाशिकच्या इंदिरानगरमध्ये राहायला होता. टेस्ला कारच्या स्फोटात दिग्विजय याचा जळून मृत्यू झाला. त्याचे वडील आणि बहिणीला नाशिकहून कॅनडात बोलावण्यात आले आणि दोघांची डीएनए चाचणी करण्यात आली. यानंतर दिग्विजयची ओळख पटवण्यास कॅनडा पोलिसांना यश आले. या दुर्घटनेने औसरकर कुटुंबावर दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळलाय.
24 तारखेला झलक पटेल दिग्विजयच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. गुजरातचे केता गोहली, नील गोहली हे भाऊ-बहिणींसह चौघेजण वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री टोरॅन्टो शहरात एकत्र जमले. त्यांच्या एका मित्राने नवीनच टेस्ला कार खरेदी केली होती. वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून हे चौघे जण ‘टेस्ट ड्राइव्ह’ला बाहेर पडले. यावेळी अचानकणे एका गतिरोधकावरून कार उलटली अन् रस्त्यांलगत असलेल्या लोखंडी गल्डरवर जाऊन आदळली. यावेळी कारने पेट घेतला. पुढे काही मिनिटांतच टेस्लाचा मोठा स्फोट झाला.
या अपघातात सुदैवाने बर्थ डे गर्ल झलकचे प्राण वाचले. एका जागरूक ट्रक ड्रायव्हरने दाखविलेल्या धाडसामुळे तिला जिवनदान मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दिग्विजय दोन वर्षांपुर्वी कॅनडात गेला होता. तिथे त्याला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती. त्याने अमेरिकेतून मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पुर्ण केले होते. तेथील विद्यापिठाने त्यास ब्रॅन्ड ॲम्बेसेडर केले होते. नोकरीनिमित्त तो कॅनडात स्थायिक होता. 15 दिवसांपुर्वीच त्याचे आई, वडील हे त्याला भेटून भारतात नाशिक येथे परतले होते. दिग्विजय हा एकुलता एक मुलगा होता.