Sada Sarvankar Post for Raj Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar) महायुतीकडून (Mahayuti) लढणार हे आता निश्चित झालं आहे. सदा सरवणकर माघार घेणार की अर्ज भरणार याची उत्सुकता असतानाच शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज दाखल केला आणि आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसमोर (Amit Thackeray) तीन वेळा आमदार झालेल्या सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. माहीममधील लढतींवरुन चर्चा रंगलेल्या असतानाच आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
सदा सरवणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून या माध्यमातून राज ठाकरेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका, आपल्याला समर्थन द्यावं अशी विनंती केली आहे. तसंच बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं असंही सांगितलं आहे. मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
"मी 40 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते," असं सदा सरवणकर म्हणाले आहेत.
"एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या," असंही ते म्हणाले आहेत.
मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो.
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य…
— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 30, 2024
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, "अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांची देखील मान्यता होती. परंतु काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं होत की तसं झालं की मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जातील," असं सांगितलं. तसंच सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते निवडणूक लढवतील असं निश्चित नसल्याचे सूचक संकेत फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले. सदा सरवणकरांसंदर्भात बोलताना, "सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही ठरवू बैठकीत," असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.