बुलढाणा : पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी बुलढाण्याच्या दाताळ्यातील बँक अधिकाऱ्याला अटक केलीय. सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसेला नागपुरातून अटक करण्यात आलीय. १८ जून रोजी एका शेतकऱ्याचं पीककर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे फोनवरून शरीरसुखाची मागणी केली होती. पीडित महिलेने यासंदर्भात मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. घटनेच्या दिवसापासून हिवसे हा फरार झाला होता. पोलीस जागोजागी त्याचा तपास करीत होते. दोन दिवसांपूर्वीच त्याचा शिपाई मनोज चव्हाण याला पोलिसांनी मूर्तिजापूर येथून अटक केली होती. मात्र हिवसे हा पोलिसांना सापडत नव्हता. उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे यांच्या नेतृत्वात मलकापूर ग्रामीण पोलिस हिवसेचा ठावठिकाणा शोधत होते. अखेर हिवसेच्या मोबाईल लोकेशनवरुन नागपूर शहरातील सक्करदरा भागातून अटक करण्यात आलीय.
बुलडाण्यात पीक कर्ज मंजूर करुन देण्यासाठी शेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं केली होती. या वर्तनामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात याचे पडसाद उमटले. आज सदर पीडित महिलेला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून नियमानुसार तात्काळ ५० हजार रुपयांचे पीककर्ज देण्यात आले. कर्जाची रक्कम सदर पीडित महिलेच्या पतीच्या हातात देण्यात आली. तर बँक शाखाधिकारी व त्याचा शिपाई या दोघांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आलीय. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी सुद्धा होणार असल्याचे बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी सांगितले.