पुणे : पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसंच पुण्यातील कोरोना संदर्भात 3 बैठका झाल्या असून यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे-पाटील तसंच संबंधित अनेक अधिकारी उपस्थित होते.
या बैठकांमध्ये कोरोना संदर्भात मोठी चर्चा झाली असून, कोरोना संकटाचा सामना एकजूटीने कसा होईल, यावर चर्चा केली असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. तसंच नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही जावडेकर यांनी केलं आहे. मास्कबाबत जनजागृतीची गरज असल्याचंही ते म्हणाले. मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड असल्याचं जावडेकर म्हणाले.
कोरोनाची चैन तोडणं गरजेचं आहे. कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. कोरोनाला हरवण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जनजागृतीसाठी गणपती मंडळ, नवरात्र मंडळ आणि इतर अनेक सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचं ते म्हणाले. तसंच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा असून सर्व यंत्रणा एकत्र मिळून काम करतील, कोरोना संबंधित प्रत्येक गोष्टीचे ताजे अपडेट सर्व यंत्रणांमार्फत दिले जाणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.