आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही अंधश्रद्धेचं भूत उतरायला तयार नाही. आजही अनेक जण अंधश्रद्धेला बळी पडतात. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे.
जादूटोणा केल्याच्या संशयावरुन एका विधवा वृद्ध महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या वाघेडा इथलं पीडित विधवा महिलेचं शेत आहे. या महिलेच्या शेजारी भैयाजी मेश्राम हा व्यक्ती राहतो.
नेमकी घटना काय?
भैयाजी मेश्राम याची पत्नी सतत आजारी राहात होता. यामागचं कारण विचारण्यासाठी भैयाजी मेश्राम एका मांत्रिकाला भेटला. त्याने शेजारी राहाणारी विधवा महिला जादूटोणा करत असल्याने तुमची पत्नी सतत आजारी पडत असल्याचं सांगितलं. यावर विश्वास ठेवत कोणतीही शहानिशा न करता भैयाजी मेश्राम आणि त्याचा मुलगा देवानंद मेश्राम यांनी विधवा वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली.
आरोपींनी विधवा महिलेच्या पुतणीलाहा मारहाण केली. यात दोघीही जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळविली आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चिमूर पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत