राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं असून, हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसंच मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो, पण सर्व निर्णय मनाप्रमाणे होत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सर्वांची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो. माझ्यासह आनंद परांजपे, बाबा सिद्धिकी असे अनेकजण इच्छुक होते. पण चर्चेअंती अखेर सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांनी काहीच म्हटलेलं नाही. कोअर ग्रुपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा अजित पवारांचा नसून, सर्वांचा निर्णय आहे," असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
तुम्ही नाराज आहात का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "मी नाराज असल्याचं तुम्हाला दिसत आहे का? मी नाराज नाही. पक्षात सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यायचे असतात. मी 57 वर्षांपासून हेच शिकत आहे. शिवसेना, शरद पवार, काँग्रेस सगळीकडे असं सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेतले जायचे. प्रत्येक निर्णय आपल्या मनाप्रमाणे होत नाही".
"सगळे आमदारच मतदान करणार आहेत. महायुतीचे आमदार जास्त प्रमाणात असल्याने त्या सहज निवडून येतील. विरोधी पक्षाकडून कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मी काही अपक्ष नाही जो मनाप्रमाणे निर्णय घेऊन अंमलात आणेन. पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे काम करावं लागतं," असं छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याप्रमाणे चालवत आहेत का? असं विचारण्यात आलं असता छगन भुजबळ म्हणाले की, "काल संध्याकाळच्या बैठकीत मी होतो. मला कुठे डावललं आहे". तसंच आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर' मधून अजित पवारांना महायुतीत कशाला घेतलं? अशी विचारणा भाजपाला केली आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, "त्यांनी अनेकांवर टीका केली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोक का घेतले अशीही टीका केली आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना घेतलं आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. पण हे तुम्ही महाराष्ट्रातील सांगत आहात. मग भारतातील इतर ठिकाणी काय झालं? तिथेही तुम्हाला धक्का बसला आहे. म्हणून नितीश कुमार. चंद्राबाबू यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करावं लागलं आहे".
शरद पवार यांनी 4 ते 6 महिन्यात सरकार बदलायचं आहे असा नारा दिला आहे. त्याबद्दल विचारण्यात आलं असता भुजबळांनी महायुतीला चर्चेचं गुऱ्हाळ सुरु न ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवं. 70, 80 जागा, बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला असून, तशा प्रचाराला आपण सुरुवात करायला हवी. आपण परत तेच चर्चेचं गुऱ्हाळ सुरु ठेवलं तर अडचणी निर्माण होतील असा इशाराच भुजबळांनी दिला आहे.
मनोज जरांगेंनी आत्मक्लेष थांबवायला हवा. ओबीसीला धक्का न देता सरकार जर सकारात्मक विचार करत असेल तर त्यांनी वेळ द्यायला हवा. सरकारला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. यामुळे विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. अनेक वर्षं मी टीकेचे घाव सहन करत आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. कोणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका. त्यानंतर हवा तो निर्णय घ्या असंची मी सांगत आहे. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी हा मुद्दा सोडणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतीक्रमण करायचं नाही. सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.