"छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला"; भाजप आमदाराचा जावईशोध

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा अजब दावा भाजप आमदाराने भर पत्रकार परिषदेत केला आहे.

Updated: Dec 4, 2022, 11:18 AM IST
 "छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला"; भाजप आमदाराचा जावईशोध title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलेला आहे. अशातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक अजब दावा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला असे प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी भर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

आमदारांना इतिहासाचे धडे द्या

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सव कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत यांनी हे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली आहे. "भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे," असे राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?

"स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी असे तुम्ही विचाराल. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली," असे प्रसाद लाड म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत प्रसाद लाड हे जवळ ठेवलेल्या चिठ्ठीमधून काहीतरी वाचत होते असेही दिसून आहे.

भाजपने चुकीचा इतिहास मांडण्याची सुपारी घेतली आहे का?

प्रसाद लाड यांच्या या विधानावरुन आता प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रसाद लाड यांनी नवीन इतिहास मांडला असे म्हटले आहे. "भाजपचे आमदार श्री प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले" .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?", असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.