लातूर : विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीकाही करण्यात येत आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तरही देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत.
वंचित आघाडी ही ए टीम तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही बी टीम होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत केलं होतं. यावर मुख्यमंत्री काय ज्योतिषी आहेत का? अशी विचारणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. तेव्हा काँग्रेसची हवा नाही हे सांगायला ज्योतिषाचीही गरज नाही, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये केला. तर आरश्यात पाहण्याची वेळ कुणावर आलीय, हे सांगण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना लगावला आहे.
'आमची लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही. आमची लढत वंचितसोबतच आहे. वंचित बहुजन आघाडीचा येत्या काळात विरोधीपक्ष नेता होईल, असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. वंचितला भाजपाची 'बी टीम' म्हणणारे काँग्रेस राष्ट्रवादीच आता 'बी टीम' होत आहे. त्याची काळजी त्यांच्या नेत्यांनी करावी', असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
वंचित बहुजन आघाडीविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरशासमोर उभे राहावे, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.