मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रकरणी एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला गरजू रुग्णांच्या मदतीसाठी वैद्यकीय निधीचं काम महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केलं जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या या प्रकरणावर अखेर महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत मदतीसाठीचे अर्ज स्वीकारून ते निकाली काढण्याचं काम हे वरळी येथील कार्यालयातून होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात मदतीसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही तात्पुरती सोय करण्यात आली असून, मदतीचे धनादेश हे मंत्रालयात स्वीकारण्यात येणार आहेत.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात घेण्यात आलेल्या या निर्णयाचा गरजू आणि गरीब रुग्णांना याची मदत होणार आहे. सध्या मंत्रालयात सहाव्या मजल्यावर या कक्षाच्या निधीसाठी देण्यात येणारे मदतीचे चेक स्वीकारले जात आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. 'झी २४ तास'ने ही बातमी लावून धरली होती. ज्यानंतर अनेक नागरिक, आमदारांनी यावर आवाज उठवल्यानंतर राज्यपालांकडे हा विषय मांडण्यात आला. पुढे हा कक्ष सुरु करण्यासाठी आता तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्या धर्तीवर आता प्रत्यक्ष अर्ज स्वीकारणं, जुने अर्ज मार्गी लावणं ही कामं पुढे होऊन गरजूंना मोठी मदत मिळण्याची चिन्हं आहेत.