राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी; राजकीय चर्चांना उधाण

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून असा एकही दिवस नाही की, भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांवर आरोप केले नसतील.  पण या सर्व गोष्टींना अपवाद ठरला तो गोंदिया येथे राष्ट्रवादीचा झालेला कार्यक्रम. 

Updated: May 13, 2022, 09:12 AM IST
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी; राजकीय चर्चांना उधाण title=

गोंदीया : महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून असा एकही दिवस नाही की, भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांवर आरोप केले नसतील. पण या सर्व गोष्टींना अपवाद ठरला तो गोंदिया येथे राष्ट्रवादीचा झालेला कार्यक्रम. चक्क या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यानेच हजेरी लावल्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया शिक्षण संस्थेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती म्हणून दुसरं-तिसरं कोणी नव्हे तर चक्क मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या हजेरीमुळे राज्यभर फक्त याच कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाच्या निमित्याने भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या युतीची तयारी तर नव्हे अशी कुजबुज सर्वत्र सुरु आहे. पण स्वत: शिवराजसिंह चव्हाण यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

भाषणात बोलतांना ते म्हणाले की, गोंदियाच्या गुणांमुळे मध्यप्रदेशात महक येते. त्यामुळेच मी गोंदियात नेहमी येतोय. गोंदिया शिक्षण संस्थेने माझा जो सत्कार ठेवला, हा प्रेमाचा असून राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही. दरम्यान यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळत, गोंदिया शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करणार असे आश्वासनही दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संस्थेत भाजपाच्या मुख्यमंत्री आल्याने भविष्यात भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेसची युतीचे संकेत तर नव्हे अशा चर्चा जनमाणसात रंगत होत्या.