कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे पन्हाळा येथे आयोजन

युवक-युवतींना सहभागाची संधी; तज्ज्ञ विचारवंतांचे लाभणार मार्गदर्शन

Updated: Apr 18, 2018, 03:49 PM IST
कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे पन्हाळा येथे आयोजन title=

कोल्हापूर : देशातील अस्वस्थ करणारे राजकीय, सामाजिक, आर्थिक वास्तव लक्षात घेता महाराष्ट्रातील विवेकवादाचा समृद्ध वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘श्रमिक प्रतिष्ठान’च्यावतीने पन्हाळा येथे ११ ते १३ मे दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे यंदा तिसरे वर्ष असून, यंदाच्या शिबीरात सहभागी होणार्‍या महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय विद्यार्थी युवक-युवतींना ‘मी आणि माझा भवताल’ या बीजविषयाशी संलग्न उपविषयांवर राज्यातील नामवंत विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

‘मी आणि माझा भवताल’

भावी नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे आशेने पाहतो; तो आधुनिक तंत्रज्ञानाचा भोक्ता विद्यार्थी-युवक आज संभ्रमित अवस्थेत आहे. इतिहासाचे ज्ञान व वर्तमानाचे योग्य भान याच्या अभावी त्याला स्वत:चीच ओळख स्पष्ट नाही. जगण्यासाठीची स्पर्धा, तंत्रज्ञानाचा विळखा यामुळे तरूणांची पर्यावरणाशी नाळ तुटलेली आहे. असंख्य वंचित-शोषित जीवांचे अस्तित्व त्यांच्या परीघाबाहेर आहे. एकूणच तरूण-तरूणींच्या जगण्याच्या आकांक्षा व वास्तव यात मोठे अंतर तयार झाले आहे. म्हणून आजच्या तरूण पिढीला व्यक्तीपासून ते पर्यावरण व आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा व्यापक भवतालाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने यंदाच्या शिबिरासाठी ‘मी आणि माझा भवताल’ असा विषय निवडण्यात आला आहे.

विविध विषयांवर तज्जांचे मार्गदर्शन

पन्हाळा येथील संजीवन इंजिनियरिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या तीनदिवसीय निवासी शिबिरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा संशोधक व समीक्षक पद्मश्री डॉ. गणेश देवी ‘२० व्या शतकातील युवकांच्या आकांक्षा व वस्तुस्थिती’ यांचा आढावा घेणार आहेत. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर हे ‘युवकांचे भावविश्व, अंधश्रद्धा व विवेकी जीवन’ या विषयावर बोलणार आहेत. सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक संजय आवटे ‘प्रसारमाध्यमे आणि युवक’ या विषयावर संवाद साधणार आहेत. तर सुप्रसिद्ध नाटकाकार व दिग्दर्शक अतुल पेठे ‘माणूस, समाज व कला’ या विषयावर विवेचन करणार आहेत. याचबरोबर ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड अजित अभ्यंकर ‘माझा शिक्षण व रोजगार हक्क’, ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनिअर ‘जात व धर्म ओळख’, सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व पत्रकार अभिजीत घोरपडे ‘पर्यावरण आणि माणूस’, ज्येष्ठ अभ्यासक दत्ता देसाई ‘व्यक्ती, व्यवस्था आणि विस्तारणारे जग’ तसेच ‘माझे जगण्याचे नवे पर्याय’ या विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस ‘माझ्या परीघाबाहेरील आदिवासी, भटके-विमुक्त, देवदासी, वेश्या, तृतीयपंथी यांचे विश्व’, प्राचार्य आनंद मेणसे ‘राजकीय भवताल, सत्तासंबंध व शासनसंस्था’ आणि ‘व्यक्ती व आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयावर आणि प्रा. डॉ. मेघा पानसरे व प्रा. डॉ. मंजुश्री पवार ‘लिंगभाव समता’ आणि ‘मैत्री, प्रेम, विवाहसंस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात विविध विषयांवर चर्चा व लघुपटांचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी, युवक, युवतींना या शिबीरात सहभागी होता येणार असून, यासाठी प्रत्येकी फक्त ३०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये दोन दिवसांचे जेवण, नाश्ता व निवासाची सुविधा दिली जाणार आहे. तसेच सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. इच्छुकांनी सुशील लाड (मोबा. 8550931003) किंवा मल्हार पानसरे (मोबा. 9923290668) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.