Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : ऐन थंडीत नागपूरमध्ये राजाकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु असताना विरोधक आक्रमक झाले आहेत. नागपुरात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली आहे. संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकण्याआधीच पोलिसांनी बॅरिगेट्स टाकून संघर्ष यात्रा रोखली आहे.
आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल झाली. सभेआधी रोहित पवारांनी आज नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात दर्शन घेतलं. यानंतर रोहित पवार यांची संघर्ष यात्रा विधानभवनाच्या दिशेने निघाली. 24 ऑक्टोबरला पुणे येथून युवा संघर्ष यात्रा निघालेय. या यात्रेने 10 जिल्हे, 30 तालुके आणि सुमारे 800 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ही यात्रा नागपुरमध्ये दाखल झाली आहे. येथेच या यात्रेचा समारोप झाला. यासाठी काढलेल्या मोर्चात शरद पवार गटाच्या नेत्यांसह काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेतेही सामील झाले होते. शेतकरी तसेच तरुणांच्या विविध मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहिच पवार यांनी ही संघर्ष यात्रा काढली.
मी पवारांचा चेला आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर 2024 मध्ये भाजप आणि फडणवीस सत्तेत येत नाहीत, ही माझी गॅरंटी आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलंय. नागपूरमध्ये रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. त्य़ावेळी राऊत बोलत होते.
काँग्रेस नेते नाना पटोले यांना पोलिसांनी उचलून नेले
याआधी शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली होती. अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. अवकाळीनं राज्यात शेतक-यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतक-यांच्या मदत देण्याच्या मागणीसाठी हा हल्लाबोल करण्यात आलाय. दीक्षाभूमीवरुन काँग्रेसच्या या मोर्चाला सुरुवात झालीय. हजारो काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. अधिवेशनावर धडकण्याआधीच काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला होता. मोर्चात सहभागी झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोलिसांनी अक्षरश: उटलून नेले होते.