सोलापूर: महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्याने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. प्रशासनानेही लसीचे दोन डोस न घेणाऱ्यां विरोधात आता कठोर नियम केले आहेत. दुसरीकडे 55 सरपंचांना एकसाथ नोटीस बजावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
सोलापुरातील 55 सरपंचांना नोटीस बजावण्यात आली आहे. सरपंचांना ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अ नुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. लसीकरणात निरुत्साह दाखवणं सरपंचांना चांगलंच भोवलं आहे.
कोरोना विरुद्ध लसीकरण मोहिमेत निरुत्साह दाखवणाऱ्या सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. 3 दिवसांत उत्तर द्या नाहीतर सरपंच पद रद्द करण्यात येईल असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 8 रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतर गावापासून ते शहरापर्यंत सर्व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली. युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबवण्यात आली. लसीकरणाचा टक्क वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामध्ये 55 सरपंचांनी निरुत्साह दाखवला आहे.
या निरुत्साही सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना लसीकरणासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे आता 55 सरपंचांना आता नोटीसला उत्तर देणं बंधनकारक आहे. नाहीतर त्यांचं पद जाण्याची शक्यता आहे.