महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकरणं राजधानी मुंबईत आढळली आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या वाढून 168 वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात करोनाच्या नव्या 50 प्रकरणांची नोंद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2023, 07:54 PM IST
महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण title=

Covid Update: महाराष्ट्रात सोमवारी करोनाचा संसर्ग झाल्याची 28 नवी प्रकरणं समोर आली आहेत. याचसोबत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. सर्वाधिक प्रकरणं मुंबई (77), ठाणे (29), रायगड (17) आणि पुण्यातील (23) आहेत. राज्यात करोनाचा नवा व्हेरियंट  JN.1 चा संसर्ग झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण ठाण्यातील आहेत. ठाण्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, सर्वजण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

धनंजय मुंडेंनाही करोनाची लागण

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. "नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, "माझे मंत्रिमडळातील सहकारी धनंजय मुंडे यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. प्रशासन राज्यात योग्य ती पावलं उचलत असून, प्रसार रोखण्यासाठी अधिकार्यांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत" 

रविवारी 50 नव्या प्रकरणांची नोंद

बीड जिल्ह्यात तिघांना करोनाची लागण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आरोग्य विभागाने लोकांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी करोनाची एकूण 50 नवी प्रकरणं आढळली आहेत. 

दरम्यान, JN.1 चे व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांना सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य आवश्यक उपकरणांची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.  केंद्र सरकारने राज्यांना व्हायरसच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सर्व नमुने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.