दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत चालला आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत ३२९ रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याबाबत गंभीरपणे विचार करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारनेही या आवाहानाला प्रतिसाद दिला आहे. रविवारच्या या जनता कर्फ्यूनंतर राज्यातील स्थितीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. यानंतर सोमवारी राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्य लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा होणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार राज्य लॉकडाऊन करण्याचा विचार करु शकते.
दुसरीकडे रविवारपासून लोकल ट्रेनच्या प्रवासावरही नियंत्रण घालण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही. यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये रेल्वे पोलीस, राज्य पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाचा अधिकारी असेल. कोकण विभागातील ५ जिल्ह्यांमधली १३५ रेल्वे स्टेशनवर विशेष पथक नेमण्यात आलं आहे.
मुंबई लोकलमधल्या गर्दीसोबतच कोकण रेल्वेमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी सांगितलं. अनावश्यक प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच होम क्वारंटाईन असणारी व्यक्ती आढळल्यास त्याची रवानगी क्वारंटाईन कक्षात १४ दिवस करण्यात येणार आहे.