चंद्रशेखर भुयार झी मीडिया, अंबरनाथ : सासू-सूनेचं भांडणं काही नवीन नाही, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक घरात सासू-सूनांमध्ये कुरूबुरी चालू असतात. मात्र एका सूनेनं टीव्हीच्या आवाजावरून झालेल्या भांडणामध्ये रागाच्या भरात सासूच्या बोटांचा जोरदार चावा घेतला. ठाण्यातील अंबरनाथ पूर्वेकडील वडवली सेक्शन परिसरात हा प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
सकाळी 11 च्या सुमारास सून विजया कुलकर्णी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती, त्यावेळी सासू वृषाली कुलकर्णी या स्त्रोत वाचन करत होत्या. आवाजाचा त्रास होत असल्यामुळे वृषाली यांनी सूनेला आवाज कमी करायला सांगितला. मात्र सूनेने त्यावेळी उलट आवाज जास्त मोठा केला.
आवाजाचा त्रास होत असल्याने सासूने स्वत: उठून टीव्ही बंद केला. टीव्ही बंद केल्यामुळे सूनेला राग अनावर झाला. दोघींमध्ये मोठा वाद झाला. हे घर माझे आहे, मी काहीही करीन, अशी अरेरावीची भाषा करत तिला सुनावले . यावर सासुनेही हे माझ्या नवऱ्याचं घर असल्याचं सूनेला सुनावलं. त्यानंतर सूनेने धक्कादायक पाऊल उचललं.
सुनेनं शिवीगाळ करत सासूच्या उजव्या हाताची तीन बोटे तोंडात घेऊन चावा घेतला. हा सर्व प्रकार बघून भांडण सोडवण्यासाठी नवरा मध्ये पडला असता त्यालाही तिने शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.