IPL 2025 Season: पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये सुरु होत असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पार्वपूर्वी सहभागी संघांनी हळूहळू आपलं नियोजन सुरु केलं आहे. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदलल्याने यंदाच्या पर्वात अधिक चुरस पाहायला मिळत आहे. एकीकडे खेळाडू बदलेले असतानाच दुसरीकडे प्रशिक्षकही बदलल्याचं दिसून येत आहे. पंजाब किंग्जच्या संघाचं प्रशिक्षकपद यंदा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगकडे असणार आहे. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच पॉटींगने एक सूचक विधान केलं आहे.
इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पार्वपूर्वी पाँटींगने पंजाबच्या संघाला यंदा नवे नियम लागू होतील असं थेटपणे सांगितलं आहे. मागील सात वर्षांमध्ये पंजाबच्या संघाने एकूण 6 प्रशिक्षक बदलले असून आता पाँटींगकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पाँटींगने नव्या नियमांची घोषणा केली असून यापैकी सर्वात महत्त्वाचा नियम हा संघाचे मालक थेट खेळाडूंशी संपर्क साधू शकणार नसल्याचा आहे. पंजाबच्या संघाची आयपीएलमधील इमेज बदलण्याचा पाँटींगचा प्रयत्न असून यासाठी त्याने काही कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
'द होवी गेम्स' या पॉडकास्टदरम्यान पाँटींगने संघाच्या नेतृत्वासंदर्भात थेट विधानं करत माहिती दिली आहे. "आता हा (पंजाबचा) संघ माझा संघ आहे. संघमालक फारच प्रोफेश्नल आहेत. त्यांना संघ यशस्वी झाल्याचं पाहायचं आहे. मात्र संघमालकांना थेट खेळाडूंशी बोलता येणार नाही. त्यांना माझ्या माध्यमातूनच खेळाडूंशी संवाद साधावा लागेल," असं पाँटींगने स्पष्ट केलं आहे. संघमालकांनी आपल्याला प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मात्र ते थेट खेळाडूंबरोबर संवाद साधणार असतील तर मला त्यावर आक्षेप असेल, असंही पाँटींगने सांगितलं आहे.
Ponting - " Its my team now #PBKS . Owners are very passionate and they want success but the communication directly to the players will be through me and not them . They can ask me questions thats ok " . Ponting #IPL2025 . VC : howie games yt pic.twitter.com/JA4pNDp1to
— (@AARYAN0791) February 4, 2025
पाँटींगने यापूर्वी 2013 आणि 2015 मध्ये आयपीएलचा चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला प्रशिक्षण दिलं होतं. 2013 मध्ये पाँटींगने खेळाडू म्हणून आयपीएलमधून बाहेर पडत सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. मुंबईच्या संघाला स्थानिक खेळाडू शोधून देण्यामध्ये पाँटींगने मोलाचं योगदान दिलं.
पुढे 2018 मध्ये पाँटींगने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं प्रशिक्षण स्वीकारलं. याचा संघावर सकारात्मक परिणाम दिसून आला. याच कामगिरीच्या आधारे आता पाँटींगकडे पंजाबचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. आता तो कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाँटींगमुळे दिल्लीप्रमाणे पंजाबचंही नशीब कात टाकणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.