Weather News : देशभरात हवामान बदलांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या याच हवामान बदलांमुळं आता अनके आव्हानं आणि समस्याही डोकं वर काढू लागल्या आहेत. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. अनेक भागांमध्ये थंडीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, दुसरीकडे दिल्लीपासून मध्य भारतापर्यंत हवामानात सातत्यानं बदल होत आहेत.
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीतच तापमानवाढीस सुरुवात झाल्यानं नागरिक हैराण होत असतानाच मध्येच येणारे शीतलहरींचे झोतही विचार करायला भाग पाडत आहेत. या सर्व बदलांचा आता अतिशय गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, असंच तज्ज्ञांचं मत. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार भारतामध्ये 2025 च्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच वसंत ऋतूसारखी चिन्हं पाहायला मिशळाली. इतकंच नव्हे, तर तिसरा सर्वात उष्ण महिना म्हणूनही नोंद करण्यात आली.
फेब्रुवारीमध्ये देशभरात कमीजास्त प्रमाणात पावसानं हजेरी लावली, किंबहुना येत्या दिवसातही पावसाची स्थिती कायम आहे. हवामानात होणाऱ्या या सर्व बदलांचं तज्ज्ञांकडून निरीक्षण केलं जात असून, यामुळं शेती, जैवविविधता आणि मानवी जीवनासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात असं त्यांनी सुचवलं.
भारतात जानेवारीची अखेर आणि फेब्रुवारीचा शेवट हा संपूर्णकाळ वसंत ऋतूसमान भासला असून, कोरडी हवा आणि तापमानवाढ ही यामागची मुख्य कारणं ठरली. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार गतवर्षीप्रमाणं यंदाचा जानेवारी महिनासुद्धा सर्वाधिक तापमानाचा ठरला.
मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान वसंत ऋतूचा काळ ग्राह्य धरला जातो. पण, भारतात यंदा वेळेआधीच वसंतासारखी चिन्हं दिसली आणि फेब्रुवारीतच देशाच्या बहुतांश भागांचं हवामाना मार्च- एप्रिलप्रमाणं भासलं. जागतिक हवामान संघटनांनी सदर परिस्थितीचं निरीक्षण करत सततच्या हवामान बदलांमुळे ऋतूचक्रावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट केलं. अभ्यासकांच्या मते हे तात्पुरत्या स्वरुपातील बदल नसून, एक दीर्घकालीन बदल आहे. ज्याचा भविष्यात अतिशय गंभीर परिणाम दिसत वसंत ऋतूच नामशेष होण्याची दाट शक्यता आहे ही वस्तूस्थितीसुद्धा त्यांनी मांडली.