Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास अनेक मोठी पक्षांतरं, पक्षांतर्गत बंडखोरी, आरोप प्रत्यारोपाची अनेक सत्र पाहायला मिळाली. मोठ्या नेत्यांनी आपले पक्ष सोडत नव्या वाटा आणि या वाटांचे नवे वाटसरु निवडले. याचदरम्यान राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडली जिथं, लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मतांची आघाडी मिळाली आणि राज्यात महायुतीचीच सत्ता स्थापन झाली.
राज्यात एक राजकीय समीकरण तग धरत नाही, तो नवं राजकीय समीकरण उदयास येतं आणि सध्या त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. खुद्द राज्याच्या उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीच याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी काही गोष्टी स्पष्ट करत मिश्किल हास्यासह 'ऑपरेशन टायगर' वर वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
'शिवसेना शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली चालते. सध्या उबाठा पक्षाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीत इथं ऑपरेशनची काहीच गरज नाही. शिंदेंच्या नेतृत्त्वात जे काम झालं आहे त्यामुळं लोकांनी शिंदेंच्या नेतृत्त्वाचा स्वीकार केला आहे. परिणामी पुढील 3 महिन्यांमध्ये माजी आमदार UBT पक्षाचं नेतृत्त्वं सोडून एकनाथ शिंदे पक्षासोबत येणार आहेत', असं उदय सामंत म्हणाले.
सामंत यांचं वक्तव्य पाहता येत्या 90 दिवसांमध्ये राज्यात राजकीय भूकंप अटळ असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा येत्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेची साथ नेमकं कोण सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी विरोधी पक्षावरही टीका केली. 'न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरुपी आक्षेप घ्यायचा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचा ही काही लोकांची फॅशन बनली आहे', असं ते म्हणाले.
राज्यात सुरू असणाऱ्या 'लाडकी बहीण' योजनेत 65 वर्षांवरील व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येत नाही, 4 चाकी वाहन असणारी व्यक्ती योजनेस पात्र नाही अशा अटी आहेत. असं असूनही अनावधानाने किंवा नजरचुकीने या महिला योजनेत सहभागी झाल्या असतील तर त्या महिलांचा आकडा आता कमी झाला आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजना जाणिवपूर्वक थांबवण्याचा कोणताही हेतू नसून ही योजना सुरूच राहील असंही सामंतांनी स्पष्ट केलं.