छत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल

Chhaava movie song Aaya Re Toofan : विकी कौशलची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' चित्रपटातील नवं गीत प्रेक्षकांच्या भेटीला. रातोरात 11,97,983 व्ह्यूज.   

सायली पाटील | Updated: Feb 7, 2025, 08:54 AM IST
छत्रपतींच्या आठवणीनं शंभुराजे भावूक; 'छावा'च्या नव्या गाण्यानं आलंय स्वराज्याचं 'तूफान', Video पाहताच ऊर भरून येईल  title=
chhaava movie song Aaya Re Toofan Vicky kaushal Rashmika A R Rahman Vaishali Samant full video

Chhaava movie song Aaya Re Toofan : महाराष्ट्र, स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे, छत्रपती संभाजी महाराज... असा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा ऊर अभिमानानं भरून जातो. मराहाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा पुढे नेत शंभुराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांनीसुद्धा वडिलांचा आणि रयतेचा विश्वास सार्थ ठरवला. अशा या राजांच्या जीवनावर, त्यांच्या कर्तृत्वावर उजेट टाकत, रुपेरी पडद्यावर चित्रपट साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उचललं असून, यात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याच्यावरही ही जबाबदारी सोपवण्यात आली. 

'छाव' या चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडगोळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचं आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा दृढनिश्चय, त्यांची लढाऊ वृत्ती, शत्रूवर मात करणारा त्यांचा गनिमी कावा आणि स्वराज्याप्रती असणारी त्यांची ओढ या साऱ्याचीच झलक चित्रपटातील नव्या गाण्यात पाहायला मिळत आहे. 2 मिनिट 17 सेंकंदांच्या या गाण्याला ए.आर. रहमान आणि वैशाली सामंत यांनी आवाज दिला असून, खुद्द रहमाननं ते संगीतबद्ध केलं आहे. इरशाद कामिल आणि क्षितीज यांच्या लेखणीतून हे गीत साकारण्यात आलं असून, त्यात अनेक बारकावे टीपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं गाणं ऐकताना लक्षा येतं. 

ढोलताशे, मराठमोळी तालवाद्य आणि त्या सोबतीनं समोर दिसणारं प्रत्येक दृश्य एक कमाल अनुभव देऊन जातं. गाण्यामध्ये महाराणी येसुबाई यांच्या नजरेत असणारा विश्वास आणि राज्याभिषेकाप्रसंगी सिंहासनाच्या दिशेनं जात असताना शंभुराजांना सतावणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण या भावना दिग्दर्शकानं अचूकपणे टीपल्याचं लक्षात येतं. 

हेसुद्धा वाचा : 'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष

 

अतिशय बोलकी दृश्य ही या गाण्याची जमेची बाजू ठरत असून, गाण्याची चाल आणि प्रत्येक शब्द ऐकताना आणि प्रत्यक्षात हे गीत पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो असं म्हणणं गैर ठरणार नाही. अनेक मराठमोळे चेहरे या गीतादरम्यान पाहायला मिळतात आणि आता नेमकी त्यांची भूमिका कशी असेल याचंही कुतूहल निर्माण करून जातात. सिनेरसिकांमध्ये कमालीचा उत्साह आणि कुतूहल असणारा हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा आता हा प्रयत्न नेमका किती यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.