US Deported Indian Includes Nagpur Man: नागपुरातून बेकायदेशीर डंकी मार्गाने म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत गेलेल्या 104 भारतीयांना अमेरिकेने मायदेशी परत पाठवलं आहे. अमेरिकने डिपोर्ट केलेल्या या व्यक्तींमध्ये नागपूरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या व्यक्तीचं नाव हरप्रीत सिंह ललिया असं असून तो 34 वर्षांचा आहे. पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हरप्रीतला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या चौकशीदरम्यान हरप्रीत नेमका बेकायदेशीररित्या अमेरिकेत कसा पोहचला याची माहिती समोर आली आहे.
हरप्रीत सिंह ललियाचा नागपुरात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. मात्र 5 डिसेंबर 2024 रोजी हरप्रीत सिंह अबुधाबी मार्गे कॅनडाला जाण्यासाठी दिल्लीतून निघाला. एजंटच्या माध्यमातूनच त्याने कॅनडाचा व्हिजा काढला होता. मात्र त्याला अबुधाबी विमानतळावर थांबवण्यात आले आणि त्याला कॅनडाच्या विमानात बसू देण्यात आले नाही. विमान कंपनीने त्याला पुन्हा दिल्लीला पाठवले.
18 डिसेंबरपर्यंत दिल्लीला थांबल्यानंतर एजेंटने मुंबईमार्गे इजिप्त आणि तिथून कॅनडाला जाण्याचा नवा मार्ग सुचवला आणि व्यवस्था ही केली. 18 डिसेंबरला दिल्लीवरून मुंबईला येऊन इजिप्तला विमानाने पाठवले गेले. 22 डिसेंबरपर्यंत इजिप्तला थांबून हरप्रीतला तिथून स्पेनची राजधानी माद्रीदला विमानाने पाठवले गेले. माद्रीद, स्पेनवरून हरप्रीतचं सामान कॅनडाला पाठवले गेले मात्र हरप्रीतसिंह ललियाला विमानाने दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालाला नेण्यात आले. हरप्रीतला ग्वाटेमालामध्ये 27 डिसेंबरपर्यंत थांबवण्यात आलं. 27 डिसेंबरला हरप्रीतला ग्वाटेमालामधून निकारागुवाला येथे विमानाने नेण्यात आलं. निकारागुवामधून रस्तेमार्गाने हौंडूरासला नेले तिथून पुन्हा रस्ते मार्गानेच हरप्रीतला ग्वाटेमालामधील दुसऱ्या निर्जन ठिकाणी आणले गेले. तिथून नदी क्रॉस करून हरप्रीतचा मेक्सिकोमध्ये प्रवेश झाला.
हरप्रीतला मेक्सिकोमध्ये मेक्सिको सिटीनंतर हरमासिलो येथे 10 दिवस माफियांच्या ताब्यात राहावे लागले. तिथून रस्ते मार्गाने पनास्को, मेक्सिकेली येथे हरप्रीतला नेले गेले यावेळी सतत बंदूकधारी माफिया त्याच्यासोबत होते. तिथून साडेचार तास पायी चालून मेक्सिको अमेरिका बॉर्डर क्रॉस करण्यात आली. अमेरिकेत प्रवेश केल्यानंतरही 16 तास पायी चालल्यानंतर अमेरिकी सुरक्षा दलांकडून अटक झाली.
तेव्हापासून हरप्रीतला भारतात पाठवेपर्यंत हरप्रीतला अमेरिकेच्या सेंटीयागो तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथे हरप्रीतला बेड्या घालण्यात आल्या. त्या तुरुंगात 13 दिवस ठेवल्यानंतर कॅलिफोर्नियामधील एका अज्ञात ठिकाणी अमेरिकी लष्करी तळावर आणण्यात आले. तिथून हरप्रीतला भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया राबवली गेली.
भारतात परत पाठवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हरप्रीतसहीत अन्य भारतीयांना घेऊन येणारं अमेरिकी लष्कराचं विमान काही ठिकाणी थांबलं मात्र ते कोणते ठिकाण होते याची कुठलीही माहिती नसल्याचं हरप्रीतने सांगितलं. परत आणताना सर्वांवर सतत नजर ठेवण्यात आली होती मात्र बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या. हरप्रीत सिंह ललियाने डंकी मार्गाने कॅनडाला जाण्यासाठी एजंटला दोन टप्प्यांमध्ये सुमारे 50 लाख रुपये दिले होते. पहिल्यांदा 18 लाख रुपये भारतात देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातले सुमारे 31 लाख 50 हजार रुपये हरमासिलोमध्ये घेण्यात आले. गुरुवारी पहाटे नागपूर आल्यानंतर हरप्रीतला नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी अमृतसरमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये ही सेंट्रल एजेंसीसने हरप्रीतची चौकशी केली होती.