RBI Cuts Repo Rate New EMI Calculator: यंदाचं वर्ष सर्वसामान्यांना अनेक गुड न्यूज घेऊन आल्याचं चित्र दिसत आहे. याच महिन्याच्या पहिल्या तारखेला वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांपर्यंत करमुक्तीची घोषणा केली. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात आल्यानंतर आता देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज मोठी घोषणा केली आहे. तब्बल पाच वर्षानंतर आरबीआयने रेपो रेटच्या दरांमध्ये कपात केली आहे. नवनियुक्त आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक पतधोरण बैठकीनंतर ही घोषणा केली आहे.
रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आता रेपो रेट 6.50 वरुन 6.25 वर आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचे हफ्ते कमी होणार असून दर महिन्याला हजारो रुपये वाचणार आहेत. अगदी गृहकर्ज असो किंवा वाहनकर्ज असो सर्वच कर्जाचा बोजा कमी होणार आहे. आजच्या आरबीआयच्या निर्णयामुळे नेमका काय फरक पडणार आहे मासिक कर्जाच्या हफ्त्यांवर ते समजून घेऊयात...
कर्जाचे दर 0.25 टक्क्यांनी कमी झाल्याने ईएमआयवर कसा परिणाम होणार किती पैसे वाचणार हे समजून घेण्यासाठी आपण 20 वर्षांसाठी 8.5 टक्के दराने कर्ज घेतलं आहे असं गृहित धरुन चालूयात.
तर 20 वर्षांसाठी 8.5 टक्के दराने 20 लाख कर्ज घेतलं असेल तर आताच्या दरानुसार 17 हजार 356 रुपये ईएमआय भरावा लागतो. मात्र आता रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी झाल्यास ईएमआय 17 हजार 41 रुपये इतका होणार आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये 20 लाखांच्या कर्जावर 3 हजार 780 रुपये वाचणार आहेत.
हेच गणित 30 लाखांच्या कर्जासाठी लावलं तर आताचा 26 हजार 35 रुपयांचा ईएमआय 25 हजार 562 इतका होणार आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये 5 हजार 676 रुपये वाचणार आहेत.
50 लाख रुपयांच्या कर्जाचा विचार केला तर सध्या 43 हजार 391 रुपये ईएमआय भरावा लागायचा तो आता कमी होऊन दर महिना 42 हजार 603 रुपये इतका होणार आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये 9 हजार 456 रुपये वाचणार आहेत. सविस्तर तक्ता तुम्ही खाली पाहू शकता.... (फोटो सौजन्य - झी बिझनेसवरुन साभार)
अशाचप्रकारे 5 वर्षांसाठी 9.2 टक्के दराने वाहन कर्ज घेतलं असेल तर रेपो रेट कमी झाल्याने तुमचे किती पैसे वाचणार आणि हे गणित कसं असेल ते पाहूयात...
3 लाखांच्या वाहन कर्जावर सध्या 6 हजार 257 रुपयांचा ईएमआय भरावा लागतोय. तो कमी होऊन 6 हजार 220 रुपये इतका होईल. म्हणजेच वर्षभरात 444 रुपये वाचणार आहेत.
5 लाखांच्या वाहन कर्जावर आता 10 हजार 428 रुपयांचा ईएमआय भरावा लागत होता. नव्या दरांनुसार आता हा ईएमआय कमी होऊन 10 हजार 367 रुपयांवर येणार आहे. म्हणजेच वर्षभरात 732 रुपये वाचणार आहेत.
अशाच प्रकारे 10 लाखांचं वाहन कर्ज घेतलं असेल तर सध्या भरावा लागणारा ईएमआय 20 हजार 856 रुपयांवरुन कमी होऊन 20 हजार 734 वर येणार आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये 1 हजार 464 रुपयांची बचत होणार आहे. (फोटो सौजन्य - झी बिझनेसवरुन साभार)
त्यामुळे एकंदरित गणित पाहिल्यास आरबीआयच्या आजच्या निर्णयामुळे खरोखरच सर्वसामान्यांना नक्कीच बराच दिलासा मिळणार आहे हे निश्चित.