प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : भारतीय तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात कारवाई करत महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून 250 किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरीतील खेड परिसरात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबाच्या चार मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव होणार्या मालमत्तेत दाऊदच्या बालपणीच्या घराचाही समावेश आहे. इथेच त्यांचा जन्म झाला. सध्या बोली लावणाऱ्यांची संख्या स्पष्ट नाही.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आता भारत सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. दाऊदचे मुळगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील मुंबके गावातील आता जमिनीचा लिलाव होणार आहे. या चारही जमिनी दाऊदची आई असिना बी हिच्या नावावरती आहेत. जवळपास चार वर्षांपूर्वी या जमिनी जप्त करण्यात आल्या. साफेमा (SAFEMA) अर्थात स्मगलर फॉरेन एक्सचेंज मेनिपुलेटर ॲक्ट अंतर्गत केंद्र सरकारनं दाऊदच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे.
त्यानंतर आता शुक्रवारी म्हणजेच 5 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत होणारा हा लिलाव लिलाव 3 पद्धतींमध्ये होईल. ज्यामध्ये ई-लिलाव, सार्वजनिक लिलाव आणि निविदा सीलबंद लिफाफ्यात बोली लावता येणार आहे. लिलावाच्या तिन्ही बोली या एकाच वेळी होणार आहे. अंदाजे 20 गुंठे इतकी ही जमीन आहे. आता लिलाव होणार्या चार मालमत्तांची एकूण राखीव किंमत 19 लाख रुपये आहे. पहिल्या जमिनीचे क्षेत्रफळ 10,420.5 चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत रु. 9.41 लाख रुपये आहे. दुसरी जमीन 8,953 चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत रु 8 लाख आहे., तिसरी जमीन जवळपास 171 चौरस मीटर आहे. त्यासाठी राखीव किंमत 15,440 रुपये आहे. तर चौथ्या जमिनीचे क्षेत्रफळ 1,730 चौरस मीटर असून त्यासाठी राखीव किंमत 1.56 लाख रुपये आहे.
एकंदरीत या जमिनीचे सातबारे पाहिल्यानंतर एक गोष्ट महत्वपूर्ण आहे. या सातबारावरती दाऊदच्या आईसह इतरही हिस्सेदारांची नावे आहेत. त्यामुळे लिलाव होत असताना दाऊदच्या आईच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा लिलाव होणार आहे. दरम्यान सध्याच्या घडीला या सातबारावरती नजर मारल्यानंतर दाऊदच्या आईच्या नावाऐवजी ''साफेमा''चे नाव दिसून येते. यापूर्वी या जमिनीचा लिलाव किंवा जमीन विकत घेण्यासाठी कोणीही रस दाखवला नव्हता. दरम्यान आता दुसऱ्यांदा हा लिलाव होत आहे. त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यासाठी नेमकं कोण पुढाकार घेतंय? ही जमीन लिलावमध्ये कोण खरेदी करतंय? हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद किंवा त्याच्या नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबाच्या साफेमाने आतापर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात 11 मालमत्तांचा लिलाव केला आहे. यापूर्वी देखील दाऊदच्या मूळ गावातील बंगला, जमीन शिवाय खेड जवळील लोटे येथे असलेला बंद अवस्थेतील पेट्रोल पंप यांचा देखील लिलाव करण्यात आला आहे.