पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आंब्याची पाने, तांब्याचा गडवा, नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या मंदिरात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजवण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. सलग १५ दिवस ३० कारागिर याकरीता काम करीत होते.
जरी वर्कचे कापड, व्हेलवेटचे कापड आणि १५० झुंबरांचा वापर सजावटीमध्ये करण्यात आला आहे. दीपावलीनिमित्त केलेली ही शुभकलशाची सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.