'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी', म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले, 'आतापर्यंत वंदनीय असणारे....'

Eknath Shinde on Sanjay Raut: शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 07:06 PM IST
'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी', म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले, 'आतापर्यंत वंदनीय असणारे....' title=

Eknath Shinde on Sanjay Raut: शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असं ते म्हणाले आहेत. "ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही," अशी जाहीर नाराजी त्यांनी जाहीर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 

टीका करणाऱ्यांचं संतुलन सध्या बिघडलं असून त्यांना द्वेषाने पछाडलं आहे. आतापर्यंत त्यांना शरद पवार साहेब वंदनीय होते, पण पवार साहेबांनी माझा सत्कार केल्यानंतर त्यांनी पवारांचाही अपमान केला, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. 

"टीका करणाऱ्यांना जनतेनं विधानसभेत त्यांची जागा दाखवली, त्यांना चारीमुंड्या चित केलं, सुपडा साफ केला, आणि घरी बसवलं. पण सध्या ते नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने इतके पछाडले आहेत, की काल त्यांनी महापराक्रमी महादजी शिंदेंचा अपमान केला. साहित्य संमेलनातील साहित्यिकांना दलाल म्हणत त्यांचा अपमान केला. शरद पवार साहेब जे त्यांना आत्तापर्यंत वंदनीय होते, पण त्यांनी माझा सत्कार केल्यामुळे यांनी त्यांचाही अपमान केला. परंतु आम्ही आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

"जनता सुज्ञ असून चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राला परंपरा आहे, संस्कृती आहे. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, जनतेनं विधानसभेत यांना धडा शिकवला आहे, पण त्यातून यांनी काही बोध घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

"ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

आम्हाला तुमचं दिल्लीतील...

पुढे बोलताना, "कदाचित पवारांची भावना वेगळी असेल. आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं, माननीय पवार साहेब," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदेंच्या मदतीने अमित शाहांनी शिवसेना फोडल्याचा संदर्भ देत शरद पवारांनी केलेला सन्मान हा एकनाथ शिंदेंचा नसून अमित शाहांचा असल्याचंही संजय राऊत म्हणाले.