Devendra Fadnavis on Satyajit Tambe : भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबच राज्यात सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. मविआ स्थापन झाल्यापासून भाजपच्या बड्या नेत्यांसह देवेंद्र फडणवीसांनीही अनेकवेळा मविआ सरकार पडण्याचा दावा केला होता. मात्र कोणीही विचार केला नसेल की एकनाथ शिंदे बंड करतील आणि आमदारसोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करतील. आता राज्यात सरकार स्थापन झालं असून शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी शिंदेंसोबत येण्याचा निर्णय घेतला. आता फडणवीसांचा काँग्रेसच्या युवा नेत्यावर डोळा आहे. (Devendra Fadnavis on Satyajit Tambe latest marathi news)
'सिटीझनविल' या कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी केला. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये सत्यजित तांबे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यासोबतच काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर सत्यजीत तांबे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली.
बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजितसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस अस बोलताच सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाहीतर स्वत: बाळासाहेब थोरात यांनाही हसू आवरलं नाही.