Devendra Fadanvis on Jitendra Awhad : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉल येथे प्रेक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठाण मांडली. त्यांना जामीन मिळाल्यानंतर देखील एकच जल्लोष पहायला मिळतोय. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईल आहे, असा टोला फडणवीसांनी आव्हाडांना लगावला आहे. कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आव्हाड करतात. त्यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, तसेच प्रेक्षकांना मारहाण केली. त्यामुळे कारवाई झाली, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आहे.
आव्हाडच नाही तर कोणीही असं केलं असतं तर असंच झालं असतं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. खूप काही तरी केल्याचा देखावा करण्याचा आव्हाडांना नाद आहे त्यातून असे प्रकार होतात, असं म्हणत त्यांनी आव्हाडांना चिमटे काढले आहेत.
आणखी वाचा - Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.