जळगाव : भाजपमध्ये गेलेले माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय. आपण भाजपमध्ये सुखी आहोत, अशी प्रतिक्रिया देत घर वापसीचे वृत्त फेटाळलेय.
राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात होते. मात्र, याबाबत गावित यांनी असे काहीही नाही. भाजपमध्ये आपण सुखी आहोत. जोपर्यंत भाजप आपल्याला पक्षातून काढत नाही, तोपर्यंत इथंच आहे, असे ते म्हणालेत.
विजयकुमार गावित यांनी भाजपात सध्या आपण सुखी असल्याचं स्पष्ट करत स्वगृही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझी मुलगी ही खासदार असून केंद्रात ती चांगले काम करत असल्याने कुठलीही तक्रार नाही. त्यांनी सर्व अफवाना छेद दिला आहे. इतर आदिवासी आमदार, खासदार, डीबीटी योजनेबाबत नाराज असल्याने त्याबाबत फेरविचार करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात नंदुरबार या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत गेलेल्या विजयकुमार गावित हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तरच विजयकुमार गावित आपली कन्या खासदार हिना गावित यांच्यासह पुन्हा राष्ट्रवादीत येऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र, असे काहीही होणार नाही, असे गावितांनी स्पष्ट केल्याने ही केवळ चर्चाच ठरलेय.
दरम्यान, निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तविण्यात आली होती. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली. मात्र, भाजपने त्यांच्या नाराजीचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांनी कोणीही एकाच पक्षात दिर्घ काळ थांबत नसतो, असे विधान केले होते. तेही काँग्रेस नेत्याच्या उपस्थित. त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.