रायगड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, न्यायसंस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न सुरू असल्याच्या काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या मताशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शवली आहे. देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतल्याचे आपण याच कालखंडात पाहिल्याची आठवण पवारांनी यावेळी करून दिली.
देशाच्या इतिहासात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नव्हती. ती या सरकारच्या काळात आली. आज ज्यांच्या हातामध्ये देशाचे सूत्र आहेत, ते ज्या संस्था जनतेचे हित सांभाळतात त्या संस्थांवर हल्ला केला जातोय, ही चिंतेची बाब आहे, असे पवार म्हणालेत.
'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग'
देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी करण्याला मर्यादा पडत असल्याची कबुली यावेळी शरद पवार यांनी दिली. त्याऐवजी राज्या-राज्यांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी करून लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपला समर्थ पर्याय देण्याचा विचार करावा, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी तेलंगणामध्ये 50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नसल्याचे बोलले होते. असे असताना महाराष्ट्रात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह यांनी सल्ला देणे गरजेचे होते, असा चिमटा पवार यांनी काढला. दरम्यान, धनगर आणि मुस्लिम समाजाला ही आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.