Honey Trap Case : डीआरडीओचे (DRDO) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (dr pradeep kurulkar) यांच्याविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. एटीएसने (ATS) 30 जून रोजी विशेष न्यायालयात आपले आरोपपत्र सादर केले होते. प्रदीप कुरुलकर यांनी भारताच्या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि रोबोटिक्स कार्यक्रमांशी संबंधित माहितीबाबत एका पाकिस्तानी महिला गुप्तचर कर्मचाऱ्यासोबत चर्चा केल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडियावर केलेल्या चॅटिंगची प्रत एटीएसने दोषारोपपत्रात जोडली आहे. या चॅटिंगमध्ये कुरुलकर यांनी झाराबरोबर अग्नी, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शुक्रवारी विशेष न्यायालयाने कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत 21 जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
आरोपपत्रानुसार, पाकिस्तानी गुप्तहेराने सोशल मीडियावर कुरुलकरशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी बनावट अकाऊंट तयार केले होते. यापैकी दोन नावं होती झारा दासगुप्ता आणि जुही अरोरा. झारा दासगुप्ता नावाने आयडी तयार करून पाकिस्तानी गुप्तहेराने ती ब्रिटनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचे सांगितले होते. आधीने झाराने प्रदीपशी मैत्री केली आणि अग्नी, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी आणि मिलिटरी बिडिंग सिस्टम, ड्रोन, यूसीव्ही आणि इतर गोष्टींची माहिती मागितली. त्यानंतर प्रदीपने ही सर्व माहिती गोळा करून पाकिस्तानी गुप्तहेराला पाठवली.
प्रदीप कुरुलकर आणि झारा दासगुप्ता व्हॉट्सअॅपद्वारे तसेच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. कुरुलकर यांनी त्यांच्या वैयक्तिक फोनवर डीआरडीओची संवेदनशील माहिती गोळा केली होती. एटीएसने कुरुलकर यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. कुरुलकरला 3 मे रोजी अधिकृत गुप्तहेर कायद्यांतर्गत हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे प्रदीप झारासमोर आपल्या कामाची फुशारकी मारत होता. 1837 पानांच्या आरोपपत्रात असलेल्या एका चॅटमध्ये, पाकिस्तानी गुप्तहेराने त्याला अग्नी-6 लाँचरची चाचणी यशस्वी झाली का, असे विचारले होते. त्यावर कुरुलकरने लाँचरचे डिझाइन माझे आहे. हे एक मोठे यश आहे असे म्हटलं होतं. कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेरामधील हे चॅट सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यानचे होते.