रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मिरजेतील कृष्णा घाटाजवळ, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचली आहे. नदीचे पाणी बाहेर पडले असून, नदीकाठच्या शेतात शिरले आहे. पाण्याची पातळी 53 फुटांवर गेली तर नदीच्या जवळपासच्या घरात पाणी जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना, वारणा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मिरजेतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने याचा फटका मिरजेतील स्मशानभूमीलाही बसला आहे. मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
मिरजेतील कृष्णा घाटावर महापालिका प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाची तयारी ठेवली असून, योग्य ती मदत महापालिका करणार असल्याची माहिती सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी दिली आहे.