BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: मद्य गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांना शुक्रवारी सहा दिवसांची कोठडी सुनावणी आली आहे. मात्र या अटकेवरुन देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशाप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर एका प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्र्याला चौकशी सुरु असतानाच अचानक अटक करणं कायद्याला धरुन नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पदावर असताना अटक झालेले केजरीवाल हे जयललिता यांच्यानंतरचे दुसरेच मुख्यमंत्री ठरले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधातच ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या टीकेला उत्तर देताना भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडीने चौकशी केली होती अशी आठवण विरोधकांना करुन दिली आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघाचे विद्यामान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोदींची ईडीकडून चौकशी झाली होती असं सांगितलं. मोदींना अटकेची भीती नसल्याने ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. विरोधकांनी खरं काही केलं नसेल तर त्यांना चौकशीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा थेट सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. "पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना 9 तास ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आलेलं. 9 तासाच्या चौकशीदरम्यान त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली होती. माध्यमे ही बातमी आता दाखवत नाहीत. मात्र हे सत्य आहे," असं गोपाळ शेट्टी म्हणाले. विशेष म्हणजे गोपाळ शेट्टी यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी यंदा पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
"विरोधक काहीही बोलले तरी त्याला फारसं महत्त्व नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशाच्या संविधानाने हे अनेकदा दाखवून दिलं आहे. भविष्यात सर्वांवर संविधानाचा धाक राहिला पाहिजे. मी आमदार, खासदार, मुख्यमंत्री असल्याने वाटेल ते करेन. मला कोणीही काहीही विचारणार नाही असं उद्या कोणीही म्हणू शकतं. असं झाल्यास कायदा फक्त गरिबांसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो," असंही शेट्टी यांनी म्हटलं. सध्या पक्षाकडून खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आल्याने शेट्टी त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा प्रचार करत आहेत.
नक्की वाचा >> '..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'
शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवली होती, अशी आठवणही शेट्टी यांनी करुन दिली. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल 9 वेळा चौकशासाठी बोलावलं होतं. मात्र ते गेले नाहीत. पण कर नाही त्याला डर कशाला? चौकशीला गेल्यास आपल्याला अटक होईल अशी भीती केजरीवाल यांना वाटत होती. याच भीतीपोटी ते चौकशीला जाण्यासाठी टाळाटाळ करत होते," असंही शेट्टी म्हणाले.