नगर: शिवसेना आणि भाजप यांच्यात काय ठरंल होतं, ते उघड करावे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. ते बुधवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी खडसे यांनी शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा हट्ट करतेय, असे म्हणता येणार नाही.
निवडणुकीपूर्वी जे ठरले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय, ते सर्वांना कळायला हवे, असे त्यांनी सांगितले. तसेच मी शिवसेना आणि भाजपमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मोठा नेता नसल्याचेही त्यांनी म्हटले.
शिवसेना-भाजपमधील सत्तावाटपाच्या तिढ्यामुळे निकालाला १३ दिवस उलटूनही राज्यात सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपासाठी आग्रह धरला आहे. मात्र, भाजप यासाठी राजी नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून पडद्यामागे वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरु आहे.
दरम्यान, आज दुपारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. भाजपच्या कालच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे.
त्यामुळे आज दिवसभरात अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अनुकूल असलेला काँग्रेस नेत्यांचा एक गट आज दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. यापूर्वी सोनिया यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी प्रतिकूल मत नोंदवले होते. मात्र, आज काँग्रेस नेत्यांनी आग्रह केल्यास सोनिया गांधी राजी होणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.