वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: हल्ली गावागावात अनेक आर्थिक गैरव्यवहार बाहेर येताना दिसत आहेत. त्यातील एक असा विमा आर्थिक घोटाळा जळगाव येथून बाहेर आला आहे. केळी फळ पीक विमा योजना राबविताना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार (Fraud News) झाल्याची तक्रार तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक क्षेत्रात केळी बाग लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विम्याच्या हप्त्याची रक्कम भरल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
याची विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन परस्पर दुसऱ्याच्या नावाने विमा काढून विम्याची (Loan Fraud) रक्कम लुटणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी करून देखील त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे. याविषयी झी 24 तासाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेतली आहे.
हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा योजना दरवर्षी तालुक्यात राबविण्यात येते. शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार कमी अथवा जास्त तापमान, गारपीट, वादळ यामुळे केळीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना फळ एक विम्याचा लाभ देण्यात येतो. मात्र यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेला असल्याच्या तक्रारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी विमा कंपनीकडून लाखो रुपये भरपाई दिली जाते. हीच संधी साधून काही दलाल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वरकमाई करण्याची नामी युक्ती शोधून काढली आहे. ज्या क्षेत्रात केळीची लागवड झालेली नाही अशा क्षेत्रावर केळी विम्याचा लाभ मिळालेला आहे.
एखाद्या क्षेत्राचा विमा काढताना मालक म्हणून संबंधित शेतकऱ्याची सही आवश्यक असते. मात्र यावेळी जोडलेल्या करार पत्रावर बनावट व खोट्या सह्या करून विमा काढून रक्कमा हडप करण्याचा हा प्रकार विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने केला असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र यावर कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनी दखल घ्यायला तयार नाही.
मात्र विमा काढताना शेतकरी सातबारा घेऊन सीएससी सेंटर वरून विमा काढण्यासाठी सातबारा लागतो पासबुक लागते आधार कार्ड लागतो मग दुसरा शेतकरी कसा काढेल हे दुसऱ्या शेतकरी काढू शकत नाही अस सांगत जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी पाठराखण केली आहे. परंतु यासंदर्भात प्राप्त तक्रारीची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे.