सातारा : तारळी नदीत पोहण्यास शिकवत असताना बुडणार्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शिरगाव येथे घडली आहे.
घटनेनंतर जवळपास १४ तासांनी आज सकाळी दुर्दैवी बापाचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला. तर या घटनेत मुलगाही नदीत बुडाला असून बुधवार सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला जात होता.
प्रवीण श्रीरंग बाचल (३८) आणि स्वप्नील प्रवीण बाचल (१०) अशी दुर्दैवी बाप-लेकांची नावे आहेत. प्रवीण बाचल हे मुलगा स्वप्नील याला तारळी नदीत पोहणे शिकवत होते. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे स्वप्निल याला पोहण्यासाठी घेऊन नदीकडे गेले होते. स्वप्नील नदीत उतरून पोहत असतानाच अचानकपणे तो बुडू लागला. हे पाहून स्वप्नील याला वाचवण्यासाठी प्रवीण बाचल यांनी नदीत उडी घेत स्वप्नील याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यावेळी स्वप्नीलने भीतीपोटी प्रवीण बाचल यांना मिठी मारली आणि त्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले.हा सर्व प्रकार एका ग्रामस्थाने पाहिला. त्यानंतर तो सायंकाळी सातच्या सुमारास गावात गेला आणि त्याने ही घटना ग्रामस्थांच्या कानावर घातली.