विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : गुंतवणूकीच्या माध्यमातून भरघोस परतावा देण्याच्या आमिषानं औरंगाबाद परिसरातील जवळपास तीन हजार लोकांना राजस्थानच्या 'गरीमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड लिमिटेड' या कंपनीनं कोट्यवधींचा गंडा घातलाय. नागरिकांच्या तक्रारीनंतर कंपनी संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
हातात गुंतवणूकीचे सर्टीफिकेट घेऊन फिरणाऱ्या या लोकांचं जगणं सध्या कठीण झालंय. कारण गुंतवणुकीच्या माध्यमातून यांची मोठी फसवणूक झालीय. २०१० ला औरंगाबादेत 'गरीमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड लिमिटेड' या कंपनीनं कार्यालय थाटलं आणि गुंतवणुकीच्या आकर्षक योजना जाहीर केल्या. यासाठी कंपनीनं राजस्थानात त्यांच मोठं प्रस्थ असल्याची बतावणी केली. तर काही लोकांना राजस्थानात नेत त्यांना एक मोठा दूध प्रक्रियेचा उद्योगही दाखवण्यात आला. या गोष्टीमुळे भुलून नागरिकांनी मोठी गुंतवणूक केली आणि त्यांच्या नशिबी फसवणूक आली.
- वार्षिक २ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत पैसै गुंतवण्याची सोय होती
- गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक १३ टक्के व्याज गुंतवणूकदारांना मिळणार होते
- गुंतवणूकीचा कालावधी ३ वर्षापासून ५ ते १० वर्षांपर्यंतचा होता
- गुंतवणूकदारांना तारणपोटी कंपनीच्या जागेवर एक प्लॉट तारण दिला जायचा
- प्लॉटची खोटी सेल डीडसुद्धा गुंतवणूकदारांना दिली जायची
- विहित मुदतीनंतर मूळ रक्क्म आणि लाभांश देण्याचंही कंपनीनं सांगितलं होतं
- गुंतवणूकदारांनी दुसरा गुंतवणूकदार आणल्यावर २ टक्के कमिशनची सोयसुद्धा होती
- त्यामुळं अनेकांनी आपल्या नातेवाईकांची मित्र मंडळीला पैशांची गुंतवणूक करवून घेतली
गुंतवणूक कालावधी संपल्यानंतर पैसे घेण्यासाठी लोक गेले असता कंपनीच्या कार्यालयाने गाशा गुंडाळल्याचं लक्षात आलं. हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी राजस्थानमधील कंपनी कार्यालय गाठले तर तिथं कार्यालयच नव्हतं. कंपनी संचालकांच्या घरी पैसे मिळतील असं आश्वासनही त्यांना दिलं दिलं. मात्र पैसे काही मिळालेच नाही.
गरीमा कंपनीच्या संचालकपदावरही मोठी नावं आहेत. राजस्थानच्या धौलपूर येथील बसपाचे माजी आमदार बनवारीलाल कुशवाह हे चेअरमन आहेत, हे सध्या खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून त्यांची पत्नी शोभाराणी या भाजपकडून आमदार आहेत. तेच ही कंपनी चालवत होते आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडल्याचे गुंतवणूकदारांना समजलंय.
फसवणुकीचा हा आकडा फक्त औरंगाबाद जिल्ह्यातच ३ हजार लोक आणि १० कोटींच्या घरात असल्याचा गुंतवणूकदार सांगतायत. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
ही कंपनी फक्त औरंगाबादपूरतीच मर्यादित नव्हती. इतर राज्यात अनेक ठिकाणी या कंपनीच्या शाखा असल्याचे समोर येतंय. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या फसवणूकीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.