Pune Crime News: पुण्यात लग्नाच्या दिवशीच थेट नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केले आहेत. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. तर, विवाहाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. करण सणस यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता. विवाहाच्या दिवशीच हा सगळा प्रकार घडल्याने नातेवाईकही धास्तावले आहेत.
विवाह समारंभ संपल्यानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळच टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. त्यांची गौरसोय होत होती. हे लक्षात येताच मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकवण्यास सांगितले. या क्षुल्लक कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. नंतर हा वाद विकोपाला गेला.
सणस यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, नवरदेव अभिजीत आणि नातेवाईकांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडे असणाऱ्या कट्यारने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. या प्रकरणी सणस यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.