उल्हासनगरमध्ये खळबळ! भररस्त्यात चाकुने वार, डोक्यात दगडी लादी घातली; आईसमोरच मुलाला संपवले

Crime News In Marathi: उल्हासनगरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे. कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हर लाईन इमली पाडा परिसरात घडली घटना.  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 12, 2024, 03:15 PM IST
 उल्हासनगरमध्ये खळबळ! भररस्त्यात चाकुने वार, डोक्यात दगडी लादी घातली; आईसमोरच मुलाला संपवले   title=
group of 10 people brutally killed 28 year old man infront of his mother

Crime News In Marathi: उल्हासनगरमध्ये टोळक्याने मिळून एका 28 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली आहे. राहुल जैस्वाल असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमली पाडा परिसरात राहणार सराईत आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी त्याच्या दोन साथीदारांनी 2022 साली राहुल याची दुचाकीला आग लावून जाळली होती. त्यावेळी राहुल याने बाबू ढकणी वर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर बाबू ढकणी हा जेलमधून जामिनावर सुटला होता. तेव्हापासून राहुल आणि बाबू यांच्यात दुष्मनी होती. 

गुन्हा मागे घ्यावा यासाठी बाबू ढकनी हा राहुलवर दबाव आणत होता. गुरुवारी पहाटे राहुल जैस्वाल याच्या घरावर आरोपी बाबूं ढकणी, करणं ढकणी आणि इतर चार ते पाच साथीदारांनी दगडफेक करून हल्ला केला. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी राहुल आणि त्याची आई फार्व्हर लाईन चौकात पोहचताच बाबू ढकणी याने धारधार चाकूने राहुल याच्यावर चाकूने हल्ला करत डोक्यात दगडी लादी टाकून जीवे ठार मारले. धक्कादायक म्हणजे, आईसमोरच आरोपींनी राहुलचा जीव घेतला. 

हत्येनंतर आरोपी फरार

राहुलची हत्या झाल्यानंतर आरोपी हे फरार झाले असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत. दरम्यान ह्या घटनेनंतर फार्व्हर लाईन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन टीम तयार करण्यात आले आहे. 

राहुलच्या हत्येनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील मुख्य आरोपी प्रेमचंद उर्फ बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकनी वय 28 वर्ष व करण मनोहर ढकणी वय 26 वर्ष यांच्यासह त्यांचे साथीदार संतोष अरुण साळवे प्रणय सुधीर शेट्टी प्रफुल्ल सुरेश कुमावत वसंत राधे ढकणी असे एकूण सहा आरोपींना अत्यंत शिताफिने 24 तासांच्या आत अटक करण्यात आलेली आहे. तर, अद्याप चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.