Ashok Chavan Resign :माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारलाय. काँग्रेस पक्ष का सोडला? याबाबतचा मोठा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षात होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. येत्या दोन दिवसात मी माझी पुढची राजकीय भूमिका काय असेल हे जाहीर करेण. अद्याप मी भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
चव्हाण भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असा खुलासा अशोक चव्हाण केला आहे. तसेच काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांशी मी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतेही आमदार माझ्या संपर्कात नाहीत असा खुलासा देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणूक च्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी सुरु असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही. राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना अथवा कारण नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबतचा निर्णय एकदोन दिवसात जाहीर करेन. मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुनी सांगायची नाहीत असं म्हणत अशोक चव्हाण यांनी पक्षाअंतर्गत नाराजीबाबत बोलणे टाळले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आहे. या सभेत मराठवाड्यातील बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. माजी मंत्री अमित देशमुख, संग्राम थोपटे, माधवराव जवळगावकर, अमित झनक, कुणाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.