खोपोली : सलग सुट्ट्यांमुळे रविवारचा दिवसही वाहतूक कोंडीचा ठरतो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची जास्त संख्या पाहायला मिळतेय. बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. शनिवारच्या तुलनेत बोरघाटात जास्त वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातायत.
बोरघाट खंडाला बोगदा ते दत्तवाड़ी दरम्यान वाहनांची संख्या लक्षात महामार्ग पोलीस अधीक्षकांकडून प्रायोगिक तत्त्वावर उपाय केले जातायत. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई लेन अर्धा अर्धा तास बंद करुन वाहतूक मोकळी करण्यात येतेय.
पुण्याहून मुंबईकडे येणा-यांनी लोणावळा मार्गे खोपोली असा प्रवास करावा असं आवाहन करण्यात येतंय. दुसरीकडे रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतायत. वाहनांच्या 5 किमीच्या रांगा इथे पाहायला मिळतायत.
मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झालीय. विकेंड आणि नाताळ सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतायत. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने पर्यटकांचे हाल होताहेत.
तसंच काही बेशिस्त वाहन चालकांचा फटका सर्वानाच सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि शक्य तिथे पर्यायी मार्गांचा वापर करा असं आवाहन करण्यात येतंय.